गबदलाच्या प्रचंड वेगात जगभरातील राजकीय, धार्मिक, भांडवलशाही साम्राज्याचे मुख्य टार्गेट युवकच आहेत. युवा मनात सध्या जाती-धर्माचा, राजकीय-सामाजिक-आर्थिक प्रश्नांचा, नातेसंबंधांचा प्रचंड गुंता झालेला आहे. अशा परिस्थितीत युवकांना समाजाच्या सद्यस्थितीकडे संविधानिक मूल्यांच्या चौकटीतून पाहायला शिकवणारी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाची ‘युवा छावणी’ विवेकी आणि विज्ञाननिष्ठ नागरिक घडवत आहे.
दरवर्षी १ ते ८ मे या दरम्यान महाराष्ट्रभरातील तरुणाई स्वभानाच्या शोधात ‘युवा छावणी’ या निवासी शिबिरासाठी येते. ‘स्वभान ते समाजभान’ ही मुख्य थीम असलेल्या या अनोख्या शिबिराची एकूण रचनाच युवकांच्या मनातील गुंता, द्वंद्व सोडवायला मदत करणारी आहे. प्रत्येक वर्षीच्या छावणीची एक विशिष्ट थीम असते. संवाद, सत्ता, विज्ञान, पर्यावरण अशा वेगवेगळ्या विषयांना धरूनच शिबिरातील सर्व उपक्रमांची रचना होते. ठरलेल्या विषयाला मानवतेच्या व संविधानिक परिमाणातून तपासले जाते. यासाठी मग त्या विषयाची सामाजिक-राजकीय बाजू, सोबत जोडलेलं अर्थकारण, जात-धर्माच्या चौकटीतील त्या विषयाचं स्थान, कुटुंबसंस्थेविषयीचे आकलन, रोजगार-करियर, जागतिक बदल या नजरेतून त्या विषयाची तपासणी अशा युवकांच्या सद्यस्थितीतील भावविश्वाला पूरक असणारे विषय यामध्ये हाताळले जातात. महाराष्ट्रातील मान्यवर तज्ञांनी क्रिएटिव्ह पद्दतीने केलेल्या प्रमुख मांडणीला मुलांनी कधीही न ऐकलेली सामाजिक संदेश देणारी गाणी, कधीही न खेळलेले व्यक्तिमत्त्व विकास करणारे खेळ यांची जोड दिली जाते. तरुणांशी त्यांच्याच भाषेत संवाद साधत विषयांचा उलगडा केला जातो. ‘श्रमसंस्कार’ हा युवा छावणीचा अतिशय महत्त्वाचा भाग. इथे रोज सकाळी केलेलं श्रमदान त्यांना राबणाऱ्या हाताचं मोल जाणवून देतं आणि आपसूक महाराष्ट्रभरातील श्रमिकांच्या हक्कांच्या लढयांमध्ये सहभागी व्हायला लावतं.
युवा छावणीच्या उद्घाटनापासूनच शिबिरार्थींच्या विचारांना चालना मिळायला लागते. आज महाराष्ट्रभरातील प्रत्येक जिल्ह्यात युवा छावणीचे कार्यकर्ते आपापले शिक्षण, नोकरी सांभाळत सामाजिक कामांमध्ये योगदान देत आहेत. साने गुरुजी स्मारक मध्ये मिळणारे खुलं व्यासपीठ व तरुणाईवर विश्वास ठेवणारे मार्गदर्शक मिळाल्याने शिबीर करून गेल्यानंतर देखील हे युवा वेगवेगळ्या भूमिकांमध्ये स्मारकाशी जोडून राहतात. साने गुरुजींचा आंतरभारतीचा विचार जाणून घेतात आणि इतरांपर्यंत पोहोचवतात. सांस्कृतिक–साहित्यिक कट्टरवादाचं स्वरूप, त्याचे परिणाम समजू घेतात आणि याबाबतीत होणारा विषारी प्रचार–प्रसार रोखण्याचा प्रयत्न करतात.
जग बदलण्याची धमक असलेल्या युवा पिढीच्या विद्रोही मनाची वैचारिक मशागत करत मानवी संस्कृती पुढील टप्प्यावर नेऊ शकणाऱ्या चांगल्या नागरिकांची एक पिढी ‘युवा छावणी’च्या माध्यमातून घडत आहे.