र्षारंग
साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाच्या ३७ एकर परिसरातील निसर्ग तिन्ही ॠतूत वेगळा रंग घेऊन समोर येतो. पावसाच्या सरींबरोबर साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाचा परिसर हिरवी झुल अंगावर पांघरतो . जवळच्या डोंगरांवर झऱ्यांचा खळखळाट सुरू होतो आणि साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक परिवारातील सर्वजण दरवर्षी पावसाळ्यातील वर्षारंग या शिबिराची आतुरतेने वाट पाहत असतात. संपूर्ण कुटुंबाने एकत्र येत रोजघडीच्या चिंता,काळज्या,दमलेपण सर्व विसरून दोन दिवस निसर्गात मस्त रमण्यासाठी “ वर्षारंग “.
महाराष्ट्रभरातून विविध क्षेत्रातील स्नेही आपल्या परिवारासह या कार्यक्रमासाठी खास वेळ काढून येत असतात त्याला कारणही तसेच आहे. साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक येथील प्रत्येक शिबिर हे वैशिष्ट्यपूर्ण आणि आगळे वेगळे असते. पावसाच्या विविध रंगासोबत विचार आणि जाणिव यांचा परिघही नकळत वृध्धिंगत करणारे दोन दिवस म्हणजे वर्षारंग. स्मारकातील प्रत्येक शिबिराचे उद्घाटन सुद्धा नावीन्यपूर्ण असते, कधी पाऊस समजून घेणारी चित्रे, कधी पाऊस आणि निसर्ग यांची संगत सांगणाऱ्या शब्दांचा कोलाज तर कधी शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन काढलेला मोर्चा अश्या वेगवेगळ्या कृतीमधून विविध भागातून आलेले सारे कधी मित्र बनून जातात ते कळतही नाही. अनोख्या उद्घाटनानंतर डोंगरावरच्या रान भाज्या असलेले आणि साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाच्या भोजनालयात तयार झालेल्या जेवणाची पंगत रंगते .
यानंतर सारे जण उत्सुक असतात ते गुडघाभर चिखलातील भातलावणी करण्यासाठी . गाव सुटल्यानंतर गावाचे वैशिष्ठ असलेली गुडघाभर चिखल तुडवीत केलेली भातलावणी प्रत्यक्षात अनुभवणे हे तर प्रमुख आकर्षण. प्रथम स्मारकाच्या प्रांगणातील वडाच्या पारासमोर सर्वांना एकत्र करून ग्रुप बनविले जातात आणि नंतर भाताचे रोप प्रत्यक्षात कसे चिखलात रोवायचे यांचे प्रात्यक्षिक दाखविले जाते . प्रत्येक गटाला जागा ठरली की नंतर चिखलात कसं उतरायचं याचा विचार करत बांधावरून फिरणारे शहरी शिबिरार्थी पुढच्याच क्षणाला चिखलात रंगून जातात आणि “डोंगरी शेत माझ ग “ पासून पारंपारिक शेती गीतांच्या लयीवर सारे हात भाताची लावणी करू लागतात .प्रत्येक गट इर्षेने, एकमेकांना प्रोत्साहन देत रोपांची लावणी करतो आणि स्मारकच्या शेताच्या मळ्या हिरव्या रोपांनी दोलू लागतात. आपल्या हाताने लावलेली ही भाताची रोपे उद्या एका दाण्याचे शंभर दाणे करणार आहेत या कल्पनेने सारेच भारावून गेलेले असतात . अर्थात मातीतील या श्रमानंतर मस्त चहा आपली वाट पहात असतो. अंगावर उडालेले चिखलाचे डाग घेऊन सेल्फी आणि ग्रुप फोटो काढत प्रत्येक जण हे क्षण टिपू लागतात.
यानंतर सुरू होतात सामूहिक खेळ , इथेही पाऊस सुरू असतानाही सारेच मोकळ्या पटांगणात हातात हात घेत या खेळात सामील होतात. लहान मुलांपासून सारेच आपापली टीम जिंकावी म्हणून शर्थीचे प्रयत्न करत असतात , अर्थात या खेळातूनही आपण बरेच काही सोबत घेऊन जातो. संध्याकाळ सोबत घेऊन येते अनोख्या मैफिली सोबत. वर्षारंगमध्ये दरवर्षी प्रसिध्द कवी, लेखक, गायक यांची उपस्थिती असते. मात्र प्रत्येकातील ऊर्जेला वाव देत इथे सारेच मैफिलीत सामील होतात. साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकातील युवा पिढी साऱ्यांना आपल्यासोबत या अनोख्या मैफिलीत कधी सामील करून घेते ते कळतही नाही आणि सारे वातावरण उत्साही होऊन जाते. दिवसभर थकलेले सारे झोपेच्या स्वाधीन होण्यापूर्वी आठवण करून दिली जाते ती दुसऱ्या दिवसाच्या सकाळच्या कार्यक्रमांची.
दुसऱ्या दिवसाची सकाळ, सारे जण नेचर ट्रेल करता तयार असतात. सकाळच्या प्रफुल्लित वातावरणात पक्ष्यांचे आवाज ऐकत शिस्तबद्ध सारे डोंगराकडे निघतात आणि नेचर ट्रेल प्रमुख आणि कार्यकर्ते वातेतील झाडे , त्यांचे उपयोग, त्यातील विविधता आपल्याला ओळख करून देत असतात. हिरव्या गावतावरून न पडता एकमेकांना सांभाळून पुढे जाताना आम्ही सारे एक आहोत आणि या निसर्गाचाच एक भाग आहोत हे अधोरेखित होते.निश्चित ठिकाणी पोचल्यावर सुरू होतात गाणी, खेळ आणि अतिशय चुरशीचा वेशभूषेची स्पर्धा रंगते. मुसळधार पावसात सर्वच शिबिरार्थीं धम्माल नाचाचा फेर धरतात . उंच डोंगारवरून शिबिरातील शिबिरार्थी यांनी केलेले वृक्षारोपण, बांधलेली तळी , तयार केलेल्या वाटा हे सारे पाहताना साने गुरुजींचे “ जग हे सारे सुंदर आहे , आपण सुंदर होऊया “ याची जाणीव होते आणि आपल्या हाताने हा परिसर हिरवा व्हावा असे वाटू लागते.
आतापर्यंत कानाकोपऱ्यांतून आलेले सर्व एकमेकांचे मित्र झालेले असतात, एकमेकांना नावाने हाक मारण्याएव्हडी ओळख झालेली असते आणि समारोपाची वेळ जवळ येत असते. दीड दिवसांत एकमेकांसोबत केलेली मजा कधी संपू नये असे वाटत असते. मात्र साने गुरुजी हा एक विचार आहे, म्हणूनच कुठलाही पुतळा न बांधता उभे राहिलेले हे राष्ट्रीय स्मारक आपण विविध दालनातून पाहू लागतो. साने गुरु प्रदर्शनी , आंतरभारती भवन , ग्रंथालय हे सारे पाहताना सारेच भारावून जातात.
समारोपाचे सत्र म्हणजे सर्वांनी अभिव्यक्त होण्याचा मंच. प्रत्येकाला बरच बोलायच असत पण वेळ भानावर आणते, आणि या दोन दिवसात अनुभवलेले अनेक आत्यंतिक आनंदाचे क्षण मनात आठवून पुन्हा पुन्हा भेटण्याच ठरवत नवे विचार – नवी ऊर्जा घेत सारे स्मारकाचा निरोप घेतात.
चला तर एक बीज रोवूया, हृदयावर
वर्षा ऋतु – वर्षारंग सोबत आहे स्नेहाची बाग फुलवूया …….
आनदांचा , उत्साहाचा , आपुलकीचा आणि स्वभानाचा रंग अनुभवण्याकरिता आम्ही आपल्याला वर्षारंग मध्ये आमंत्रित करत आहोत.