लगड, कोकणातलं एक छोटंसं गाव. तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी. साडेतीन हजाराच्या घरात लोकसंख्या असलेलं हे गाव साने गुरुजींचं गाव म्हणून आज ओळखलं जातं. गुरुजींचं ‘श्यामची आई’ ज्यांनी वाचलंय, त्यांना हे गाव ओळखीचं असेल, पण ते विसाव्या शतकाच्या सुरुवातीचं. आज मात्र साने गुरुजींच्या जीवनातल्या वेगवेगळ्या पैलूंचं दर्शन घडवणारं ‘साने गुरुजी स्मृती भवन’ दिमाखात उभं आहे.
गुरुजींचं लहानपण पालगड गावात गेलं, प्राथमिक शिक्षणही इथेच झालं. पुढच्या शिक्षणासाठी गुरुजींनी पालगड सोडलं, ते स्वातंत्र्यलढ्यात उतरले आणि मग त्यांना गावाला येण्याची फार उसंतच मिळाली नाही. त्यांच्या मनात मात्र आपलं गाव आणि गावातलं घर कायम असे… स्वातंत्र्याच्या धामधुमीत असतानाच हे वडिलोपार्जित घर जीर्ण झाल्याचं त्यांना कळलं आणि गावातल्या एका माणसाकडून त्यांनी ते बांधूनही घेतलं. पण तरीही गुरुजी तिथे फार वेळा येऊ शकले नाहीत. १९५० मध्ये गुरुजींच्या निधनानंतर घराचा वापर व्हावा यासाठी एका नातेवाईकाला ते तात्पुरतं वापरण्यास सांगण्यात आलं.
सन २००० या साने गुरुजींच्या जन्मशताब्दी वर्षात गुरुजींनी बांधलेलं हे घर स्मृतीभवन म्हणून जतन करावं, अशी इच्छा गुरुजींची पुतणी सुधा बोडा, तुलसी बोडा, अरुणा शहा अशा त्यांच्या काही कुटुंबीयांनी व्यक्त केली. त्यांची कल्पना सर्वांनाच आवडली आणि अनेक मान्यवर आणि कार्यकर्ते कामाला लागले.
साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टने कोकणात गुरुजींचं राष्ट्रीय स्मारक उभारणं आणि त्यांच्या पालगड येथील घराचं स्मृती भवन म्हणून जतन करणं, ही उद्दिष्टं ठरवली. घराचं काम हातात घेतलं. परंतु गुरुजींच्या घरात राहाणार्या नातेवाईकांनी घर ताब्यात देण्यासाठी पर्यायी जागेची मागणी केली. पैशांची अडचण होती. स्मारकाने सरकारला साद घातली. विश्वस्त मृणालताई गोरे स्वतः तत्कालीन सांस्कृतिक मंत्री प्रमोद नवलकर यांना भेटायला गेल्या. नवलकर यांनी यात व्यक्तिशः लक्ष घातलं. पालगड येथील घरात राहणाऱ्या नातेवाईकांना महाराष्ट्र शासनाने चार लाख रुपये दिले आणि महाराष्ट्र शासनाने घर ताब्यात घेऊन साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टकडे सोपवलं.
घराचं मूळ स्वरूप कायम ठेवण्यात आलं, मात्र दुरुस्ती आणि नूतनीकरण केलं गेलं. घरामध्ये गुरुजींचं आकर्षक छायाचित्र, त्यांच्या हस्ताक्षरातील मजकूर, संदेश, त्यांचा स्वातंत्र्य लढ्यातील सहभाग, गुरुजींच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या प्रसंगांची उपलब्ध छायाचित्रं पॅनलच्या स्वरूपात भिंतीवर लावण्यात आली. आता स्मृती भवनाला भेट देणार्यांच्या आठवणींना उजाळा मिळतो, नव्या पिढीला माहिती मिळते. पालगड ग्रामस्थांचंही यासाठी मोठं सहकार्य मिळालं आहे, अजूनही मिळतं.
११ जून हा गुरुजींचा स्मृतिदिन साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट, गुरुजीप्रेमी व्यक्ती आणि पालगड येथील विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांतर्फे उत्साहात साजरा करण्यात येतो. कुमार वयात एक आणा फी भरता आली नाही म्हणून ज्या शाळेतील हजेरी पटावरुन गुरुजींचं नाव काढून टाकण्यात आलं, त्या साने गुरुजी विद्यालयाच्या आवारात हा कार्यक्रम होतो. शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ, ट्रस्टचे पदाधिकारी आणि साने गुरुजीप्रेमी मंडळी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहतात. महाराष्ट्राच्या नकाशावर पिटुकल्या दिसणार्या पालगडला आता गुरुजीप्रेमी मंडळींची वर्दळ असते.