तरभारती अनुवाद सुविधा केंद्र
भारताच्या विविधतेमधून एकतेचे दर्शन घेण्याची, “अविभक्त विभेक्तेषु” अशी सानेगुरूजींची थोर दृष्टी होती. ७ मे, १९४९ च्या साधनेच्या अंकात ‘प्रान्त भारतीचे माझे स्वप्न’ या लेखात गुरुजींनी आपले विचार प्रथम मांडले होते. हे सर्वज्ञात आहेच. साने गुरूजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टच्या अंतर्गत त्यांच्या ह्याच विचारांना पुढे नेत निरनिराळ्या भाषांतील लेखक वाचकांच्या संवादापलीकडे जाऊन प्रत्यक्ष अनुवादाच्या कामाला चालना मिळावी ह्या उद्देशाने स्मारकाच्या अंतर्गत आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्राची ७ मे, २००६ रोजी रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीच्या दिवशी स्थापना करण्यात आली. रामदास भटकळ यांच्या अध्यक्षतेखाली मंगेश पाडगावकर, जितेंद्र भाटिया, सुरेश दलाल, वीणा आलासे आणि संस्थेचे संस्थापक गजानन खातू ह्या हितचिंतकांच्या मार्गदर्शनाखाली पहिली बैठक पार पडली आणि अग्रक्रमाने केंद्राच्या कामाला सुरुवात करण्यात आली.
मा यमावशी
गेल्या वीस वर्षांत डॉ. रामदास भटकळ, प्र.पुष्पा भावे व कवयित्री नीरजा यांच्या अध्यक्षतेखाली आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्र जोमाने काम करत आहे. आजवर केंद्राने अनुवादविषयक विविध उपक्रम सुरू केले. त्यातील एक महत्वाचा उपक्रम म्हणजे, ‘मायमावशी’ हे अनुवादाला वाहिलेले षण्मासिक. या षण्मासिकाचे प्रकाशन डिसेंबर,२००७ मध्ये आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्राचे अध्यक्ष आणि सल्लगार संपादक रामदास भटकळ आणि संपादक अर्जुन डांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. पहिल्या अंकाचे संपादन सुप्रसिद्ध पत्रकार सुनील कर्णिक यांनी केले होते. वर्षातून दोनदा प्रकाशित होणाऱ्या या अंकात अनुवादाविषयी अनुवादकांचे अनुभव, मराठीतील महत्वाच्या लेखकांनी अनुवादाचे केलेले काम, भारतीय भाषेत विविध पातळ्यांवर अनुवादविषयी होणाऱ्या घडामोडींचीही माहिती आणि साहित्यविश्वाबरोबरच विविध क्षेत्रातील भाषांतराचे महत्त्व विषद कऱणारे लेख या अंकात दिले जातात. आतापर्यंत जेष्ठ सल्लागार संपादक रामदास भटकळ व पुष्पा भावे यांच्या मार्गदर्शनाखाली कवयित्री नीरजा, अनुवादक चंद्रकांत भोंजाळ आणि कवी गणेश विसपुते यांनी अंकाच्या संपादनाचे काम केले आहे. सल्लगार संपादक म्हणून सुनील कर्णिक, अलका गाडगीळ, उषा मेहता होत्या.
नुवाद कार्यशाळा
केंद्राचा तिसरा उपक्रम. प्रत्यक्ष अनुवाद कसा होतो. तो का आणि कसा करावा याचंही एक तंत्र असतं. ते आत्मसात करण्यासाठी आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्र माणगाव येथील स्मारक परिसरात अभ्यासकांसाठी अनुवाद कार्यशाळेचं आयोजन करत आलेला आहे. पहिली कार्यशाळा ही २००८ मध्ये वडघर, साने गुरूजी स्मारकावर अनुवाद कार्यशाळा घेतली होती. या कार्यशाळेत डॉ. मिलिंद मालशे होते. तसेच साने गुरूजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष अर्जुन डांगळे, आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्राचे अध्यक्ष रामदास भटकळ, सल्लागार प्रमोद तलगेरी, कार्याध्यक्ष नीरजा उपस्थित होत्या. त्यानंतर दरवर्षी तज्ज्ञ अनुवादकांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा घेतली जाऊ लागली. अलिकडे महाविद्यालयीन पातळीवरही विद्यार्थ्यांसाठी अनुवाद कार्यशाळा आयोजित केली जाते. ही कार्यशाळा अभ्यासाचा एक भाग म्हणून तर असतेच पण त्यासोबत विद्यार्थ्यांना अनुवादाच्या या क्षेत्राची ओळख व्हावी आणि त्यांनीही अनुवादाच्या या कामात स्वत:ला तयार करावे म्हणून विविध महाविद्यालयात अनुवाद कार्यशाळा आयोजित केल्या गेल्या.
हित्य संवाद
आंतरभारती अनुवाद केंद्राचा सर्वात महत्त्वाचा उपक्रम म्हणजे दर दोन वर्षांनी होणारा ‘साहित्य संवाद’ भारतीय साहित्यिकांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी आणि त्यांच्यात वैचारिक देवाण-घेवाण व्हावी यासाठी ‘आंतरभारती साहित्य संवाद’ आयोजित केला जातो. साहित्य संवादाच्या व्यासपीठावर आतापर्यंत भारतीय भाषेतील ज्येष्ठ साहित्यिक, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिकांनी आपल्या विचारांची देवाणघेवाण केली होती. त्यात हिंदी साहित्यिक कमलेश्वर, आसामी लेखिका इंदिरा गोस्वामी, नाटककार गिरीश कर्नाड, अलेक पद्मसी, रामू रामनाथन, हिंदी लेखक विष्णू खरे, अशोक बाजपेयी, मंगलेश डबराल, मल्याळम कथाकार मानसी, तमीळ लेखिका बामा, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, गणेश देवी, अंतरा देब सेन, जेसिंता केरकट्टा, कोकणी लेखक दामोदर मावजो, भारत पाटणकर, प्रवीण बांदेकर, विवेक सचदेव आदी मान्यवर सहभागी झालेले आहेत.
ळशास्त्री जांभेकर अनुवाद पुरस्कार
आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्राचा दुसरा महत्त्वाचा उपक्रम. विंदा करंदीकर यांनी ज्ञानपीठ पुरस्काराच्या मिळालेल्या रकमेतून स्मारक ट्रस्टला देणगी देऊन त्या रकमेच्या व्याजातून इतर भारतीय भाषेतून मराठीत अनुवादित झालेल्या पुस्तकास पुरस्कार द्यावा अशी विनंती केली होती. त्यानंतर २००७ सालापासून केंद्रातर्फे त्या त्या वर्षांतील महत्त्वाच्या अनुवादित पुस्तकाला ‘दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर अनुवाद पुरस्कार’ दिला जात आहे. आतापर्यंत १४ पुरस्कार देण्यात आले. साहित्य क्षेत्रातील मान्यवर लेखक तसेच अनुवादक या समितीवर काम करतात. सुप्रसिद्द लेखक सुभाष भेंडे, दीपक घारे, सुमन बेलवलकर, प्र.ना.परांजपे, डॉ. हरिश्चंद्र थोरात इत्यादी मान्यवरांनी या समितीवर काम केले आहे.
ले खक मेळावा
अलिकडेच कवयित्री नीरजा यांच्या कल्पनेतून प्रथमच लेखक मेळावा घेण्यात आला. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील अनेक भागांतून जेष्ठ आणि तरुण असे महत्त्वाचे लेखक यात सामील झाले आणि एक वैचारिक घुसळण घडवून आणली. प्रथमच सुरू केलेल्या या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. भारतातील विविध भाषांचा पूल बांधण्याचं साने गुरुजींचं स्वप्न प्रत्यक्षात उतरणवण्याचा प्रयत्न करणारे आंतरभाती अनुवाद सुविधा केंद्र यापुढेही अनुवादाचे काही महत्त्वाचे प्रकल्प घेऊन भाषांतराच्या क्षेत्रात महत्त्वाचे काम करत राहील.