“तरुणाईची प्रयोगशाळा“
साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक. तिसर्या सहस्रकाच्या तोंडावर, २००० मध्ये उभं राहिलेलं एक महत्त्वपूर्ण घटित – हॅपनिंग. ‘हॅपनिंग’ दोन्ही अर्थांनी. घटित, म्हणजे घडून गेलेलं म्हणूनही आणि सतत काहीतरी घडत असणारं म्हणूनही. इथे सतत काही होत असतं, काही घडत असतं; काही चर्चेत असतं, काही प्रत्यक्ष कृतीत असतं; कधी भूतकाळाचं मूल्यमापन असतं, कधी भविष्याचा वेध असतो. एकत्रितपणे या सार्यातून तरुणाईला एकविसाव्या शतकातल्या वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांमध्ये, समस्यांमध्ये हस्तक्षेप करण्याची शक्यता आणि संधी स्मारक देत आलं आहे. राष्ट्रीय स्मारकाची उभारणी झाली आहे तीच मुळी येणाऱ्या पिढ्यांच्या स्वप्नांना वाव देण्यासाठी. आणि त्याचमुळे इथे सलग दहा वर्षांहून अधिक काळ कोणी विश्वस्त होऊ शकत नाही आणि पासष्ट वर्षं वयानंतर विश्वस्त राहू शकत नाही. नित्यनूतन निसर्गाप्रमाणे तरुणाईने स्मारकाचं वाहक व्हावं ही अपेक्षा आहे.
व्यक्तीपेक्षा विचार महत्त्वाचा आहे. गांधी – फुले – आंबेडकर यांचं अभिव्यक्ती रूप म्हणजे साने गुरुजी. गुरुजींच्या विचार आणि कृतीतून ‘आयडिया ऑफ इंडिया’ आपल्यापुढे उलगडते. उदार, उदात्त, सहिष्णू, विवेकी अशा भारतीय संस्कृतीची ओळख करून देणारं ‘भारतीय संस्कृती’ हे पुस्तक वयाच्या चौतिसाव्या वर्षी लिहिणारे साने गुरुजी हे तरुणांचे ‘आयकॉन’ होते. कुमार–युवकांचं भावजीवन समृद्ध करण्याचा त्यांचा ध्यास होता. स्वातंत्र्य लढ्याबरोबर शेतकरी, कामगार, सामाजिक समता अशा अनेक अघाड्यांवर संघर्ष करणारे ते प्रेरक नेते होते. ‘सोन्यामारुती’सारखं दाहक पुस्तक लिहून प्रतिगामी विचारांवर हल्लाबोल करणारे विद्रोही होते.
विविध भारतीय भाषा आणि प्रांताप्रांतातील संस्कृती यांच्यातील आदानप्रदानाचा त्यांचा ‘आंतरभारती’चा विचार संपूर्ण देश आणि देशात नांदणार्या विविध संस्कृती कवेत घेणारा आहे. माणसांना परस्परांशी जोडणारे बिंदू साहित्य आणि संस्कृतीच्या रूपात त्यांच्यासमोर ठेवणारा आहे. वेगवेगळ्या कला आणि त्यांचे वेगवेगळे आयाम यांच्यात लय साधणारा आहे. आणि असाच पुढे नेला तर हा विचार रवींद्रनाथांच्या विश्वभारतीपर्यंत जाणारा आहे. हा विचार स्मारकाच्या कामाचा महत्त्वाचा भाग होऊ शकतो. दुसरीकडे, एकविसाव्या शतकातील ‘आयडिया ऑफ इंडिया’ या व्यापक आणि सर्वसमावेशक विचारातून स्पष्ट होऊ शकते.
स्मारकासाठी निसर्गाशी जवळीक साधणारी छत्तीस एकर जागा घेताना हा व्यापकतेचा विचार होताच, त्याचबरोबर आजच्या पिढीपासून दुरावलेला निसर्ग आणि दुरावलेली नाती त्यांच्या जवळ यावीत, असंही मनात होतं. तीनचार एकरावरही स्मारक उभं राहू शकलं असतं, पण त्याला व्यापकतेचा स्पर्श झाला नसता. विस्तारित होणारं जग आणि संकुचित होणारा माणूस याची कोंडी फोडायची तर विचारांच्या कक्षा रुंदावल्या पाहिजेत आणि अवकाशाचा आवाकाही समजला पाहिजे. पुतळे म्हणजे स्मारक नसतं, उपक्रम आणि कार्यक्रम म्हणजे संस्था नसते. संस्थेच्या विचारांची ती अभिव्यक्ती असते. परंतु स्मारक संकल्पना त्यापलीकडे जाणारी आणि अशक्य ते शक्य करण्यासाठी आव्हानांना झेलणारी असते.
साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक कोणत्याही एककलमी कार्यक्रमासाठी उभारलेलं नाही. विचारांच्या कक्षा रुंदावणारं व्यापक परिवर्तनाचं उद्दिष्ट ही स्मारकाची व्याप्ती आहे. कुमार युवकांची शिबिरं, अनुवाद सुविधा केंद्राचा विस्तारित होणार उपक्रम, कलाभवन, जैवविविधता केंद्राची नवीन स्वप्नं जागवीत स्मारक पुढे जात आहे. अनेक संस्था संघटनांचं ते हक्काचं ठिकाण झालं आहे.
महाराष्ट्रातील परिवर्तनासाठी उत्सुक तरुणाईची प्रयोगशाळा हीच स्मारकाची ओळख व्हावी.
– गजानन खातू
कार्यकारिणी समिति
सदस्य
सल्लागार समिति
पदसिद्ध सदस्य
“भूतकाळातील काही गोष्टी आता चुकीच्या वाटल्या तर त्या दूर न करणे म्हणजे भूतकाळाचा अपमान आहे. भूतकाळातील भ्रामक गोष्टी जर तशाच पुढे चालवू तर ते उचित नाही. तो भूतकाळाचा गौरव नाही. तो पूर्वजांचा गौरव नाही. उलट त्या थोर पूर्वजांचा अपमान करण्यासारखे आहे.”
– साने गुरुजी