भिव्यक्ती
विकास मनाचा आत्मविश्वास भरण्याचा,.
११ ते १४ या वयोगटातील मुला मुलींसाठी हे शिबिर आयोजित केले जाते खरं तर हे वय धमाल करण्याचं, कुतूहल जाणून घेण्याचं, समजून घेण्याचे, निखळ जगण्याचं, भरपूर धमाल करत गाणी, गप्पा, पक्षी निरीक्षण, आकाशवाचन, निसर्ग पर्यटन अशा अनेक गोष्टीतून स्वतःला घडविण्याचे. स्वतःला स्वतःची ओळख करून देत समाजभान जागं करण्याचं.
हसत खेळत आनंद घेत बैठे-मैदानी खेळ खेळत, पर्यावरण प्रेम, अंधारातील थरार, चांदण्यातील सफर, बैलगाडीतून फेरफटका, फिरत्या चाकावरील मातीकाम, फिल्मी कॅमेरा, मंचावरील धिटाई या सारख्या अनेक नाविन्यपूर्ण गोष्टींची नातं जोडणारं असं हे शिबिर असतं. मुलांना स्वानुभवातूनच जीवनमूल्य शिकता यावीत यावर भर देणाऱ्या साने गुरुजींचे विचार पुढे नेणा-या या स्मारकात या वयोगटातील मुलांचं भावनिक विश्व मोठं करत संस्कारक्षम मन समाजाभिमुख बनविने हाच खरा उद्देश. आणि यातूनच साकारलेले हे अभिव्यक्ती शिबिर.
स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर लगेचच म्हणजे २२ एप्रिल ते २६ एप्रिल २०१४ या कालावधीत पहिले अभिव्यक्ती शिबिर संपन्न झाले. सध्याच्या आधुनिक जीवनशैलीत दुरापास्त झालेले या मुलांचे मातीशी नाते घट्ट करण्याच्या संकल्पनेनेच या शिबिराची सुरुवात करण्यात आली आणि पहिल्याच दिवशी आणि त्यानंतर होणाऱ्या प्रत्येक अभिव्यक्ती शिबिरात शिबिराच्या या मुलांना विविध प्रकारच्या मातीची ओळख या मातीशी हात मिळवणे आणि याच मातीच्या गोळ्यातून तयार झालेल्या चाकावरील मातीकामातून निर्माण होणारे विविध आकार आपल्या तळ हाता वर घेऊन निर्मितीचा आनंद अनुभवताना पाहून त्यांच्या पालकांना आणि आम्हालाही होणार आनंद हा काही औरच. या शिबिरात घेण्यात येणाऱे सर्व विषय, कृतिकाम, खेळ हे नुसती सुट्टीतील मजा किंवा छंद जोपासणे इतकं मर्यादित न ठेवता त्या त्या विषयांची ओळख करून कलागुणांना हळुवार उलगडत, वृद्धिंगत करत मुलांचे भाव विश्व जपत त्या त्या विषयातील तज्ञ व्यक्ती या मुलांशी संवाद साधत असतात.