Sane guruji
सा

ने गुरुजी हे दोन शब्द जवळजवळ आले की महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या मनात त्याच्या शाळेतल्या प्रार्थनेचे स्वर घुमू लागतात.

‘खरा तो एकची धर्म’ सारखी प्रार्थना, ‘आता उठवू सारे रान’, ‘बलसागर भारत होवो’ सारखी स्फुर्तीगीतं चालीसकट मनामध्ये येणार नाहीत असा मराठी माणूस विरळाच म्हणावा लागेल. ‘श्यामची आई’ पुस्तक आणि सिनेमानं आपल्या सर्वांच्या मनावर एकदम अमीटसा प्रभाव टाकला आहे.

११ जून १९५०  रोजी साने गुरुजींचे निधन झाले. आज त्याला सात दशके उलटली असली तरी त्यांच्याबद्दलची आपली बहुतांश माहिती श्यामची आई आणि स्फूर्तिगीतांपर्यंतच थांबते. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या काळात क्रांतीकार्य करणारे, लहान मुलांसाठी, अखिल विश्वासाठी लेखन करणारे, सतत विचारमग्न राहाणाऱ्या या व्यक्तीचं आयुष्य लोकांपर्यंत पूर्णपणे यावे या हेतूस्तव हा लेख प्रपंच.

जन्म : २४ डिसेंबर १८९९ – मृत्यू :११ जून १९५०

पूर्ण नाव : पांडुरंग सदाशिव साने . त्यांचे वडील कोर्टाचे काम करीत असत. कोर्टाचे घराणे साधारणतः वैभवसंपन्न व श्रीमंत समजले जाते व त्यांच्या आजोबांच्या वेळची परिस्थिती तशी होती ही. पण त्यांच्या वडिलांच्या, सदाशिवरावांच्या वेळेपासून मात्र घराण्याची आर्थिक स्थिती घसरत गेली. ती इतकी की, घरदारही जप्त झाले. अशा रितीने बडे घर पण पोकळ वासा झालेल्या या घराण्यात पांडुरंगचा जन्म झाला. त्यांच्यावर त्यांच्या आईच्या शिकवणुकीचा फार मोठा प्रभाव पडला होता. त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवनविकास झाला. पालगडला प्राथमिक शिक्षण झाल्यावर पुढच्या शिक्षणासाठी त्यांची रवानगी पुण्याला करण्यात आली. नूतन मराठी विद्यालयात शिक्षण झाल्यावर न्यू पूना कॉलेजमधून त्यांनी मराठी आणि संस्कृत साहित्यात त्यांनी एम. ए पदवी मिळवली.

शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील प्रताप हायस्कूल येथे शिक्षक म्हणून सहा वर्षे (१९२४ ते १९३०) नोकरी केली. प्रताप हायस्कूलच्या वसतिगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील शिक्षकाला अधिक वाव मिळाला. त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या उदाहरणातून स्वावलंबनाचे धडे दिले, सेवावृत्ती शिकवली. अंमळनेर येथील प्रताप तत्त्वज्ञान केंद्र येथे त्यांनी तत्त्वज्ञानाचा अभ्यासही केला. इ.स. १९२८ साली त्यांनी ‘विद्यार्थी’ हे मासिक सुरू केले. त्यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा फार मोठा प्रभाव होता. ते स्वतः खादीचाच वापर करत असत. इ.स. १९३० साली त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. त्यांनी ‘काँग्रेस’ नावाचे साप्ताहिक काढले. दुष्काळात शेतकऱ्यांची करमाफी व्हावी म्हणून प्रयत्न केले. जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील काँग्रेस अधिवेशन (१९३६) यशस्वी होण्यासाठी त्यांनी खूप काम केले.

१९३५ च्या सुमारास साने गुरुजी डाव्या विचारांच्या संपर्कात आले होते असं निरीक्षण मुंबई येथील एसएनडीटी महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाच्या प्रमुख चैत्रा रेडकर यांनी नोंदवलं आहे. “साने गुरुजी १९३० च्या दशकात डाव्या कम्युनिस्ट विचारांच्या संपर्कात आले होते. १९३६ च्या प्रांतिक सरकारमध्येही काँग्रेसने रॅडिकल भूमिका घ्यावी असं त्यांचं मत होतं.

इ.स. १९४२ च्या चळवळीत भूमिगत राहून स्वातंत्र्याचा प्रचार केला. फैजपूर येथील अधिवेशनात महात्मा गांधींच्या विचारसरणीस अनुसरून त्यांनी ‘मैला वाहणे’ व ग्राम स्वच्छतेची इतर कामे केली. असहकार आंदोलनात भाग घेतल्यानंतर त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला.

दुसरं महायुद्ध सुरू झाल्यावर काँग्रेस आणि डाव्यांनी युद्धविरोधी भूमिका घेतली होती. पण रशिया युद्धात उतरल्यावर डाव्यांनी रशियाला पोषक भूमिका घेतली. त्यामुळे साने गुरुजी डाव्यांपासून दूर गेले. तोवर इकडे त्यांच्यापासून काँग्रेसही दुरावली होती.

साने गुरुजी यांनी राष्ट्र सेवा दलाची स्थापना केली. ‘पत्री’ या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहातून साने गुरुजीच्या देशभक्तिपर कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यातील बलसागर भारत होवो सारख्या कवितांचा नागरिकांवरील वाढता प्रभाव लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने त्या काव्यसंग्रहाच्या प्रती जप्त केल्या.

समाजातील जातिभेद, अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट रूढी व परंपरांना साने गुरुजींनी नेहमी विरोध केला.सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी १९४६ च्या दरम्यान महाराष्ट्राचा दौरा केला, या भूमिकेला महात्मा गांधींचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला, तो शेवटपर्यंत मिळाला नाही. अखेर साने गुरुजींनी या मुद्यावर उपोषणाचा मार्ग अवलंबला व त्यांना यश मिळाले. ‘एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला खऱ्या अर्थाने मुक्त केले,’ असे त्या वेळी म्हटले गेले.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते समाजवादी पक्षात सामील झाले. स्वातंत्र्यानंतर आंतरभारती चळवळीच्या मार्गाने त्यांनी भारत जोडण्याचा प्रयत्न केला. विविध राज्यांतील लोकांनी एकमेकांची संस्कृती समजून घ्यावी, अनेक भाषा समजून घ्याव्यात असे या चळवळीत अभिप्रेत होते. ते स्वतः तमिळ, बंगाली आदी भाषा शिकले होते. १९४८ मध्ये त्यांनी ‘साधना’ साप्ताहिक सुरू केले. त्यांच्या कथा, कादंबऱ्या, लेख, निबंध, चरित्रे, कविता यांमधून त्यांच्यातील संवेदनशील साहित्यिकही आपल्याला दिसतो. मानवतावाद, सामाजिक सुधारणा व देशभक्ती ही मूल्ये त्यांच्या साहित्यात ठायी ठायी दिसतात.

त्यांनी एकूण ७३ पुस्तके लिहिली. त्यांनी त्यांचे बहुतांश लेखन हे तुरुंगात असतानाच केले. ‘श्यामची आई’ ही सुप्रसिद्ध कादंबरी त्यांनी नाशिकमधील तुरुंगात असतानाच लिहिली. आचार्य विनोबा भावे-रचित गीता प्रवचने सुद्धा विनोबा भावे यांनी धुळे येथील तुरुंगात (१९३२) सांगितली व साने गुरुजींनी लिहिली. याच धुळ्यातील तुरुंगात त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबद्दल सुमारे १५ महिन्यांचा तुरुंगवास भोगला. तसेच पुढे बंगलोर येथील तुरुंगात असताना त्यांनी तिरुवल्लिवर नावाच्या कवीच्या ‘कुरल’ नावाच्या तमिळ महाकाव्याचे मराठीत भाषांतर केले. नंतर फ्रेंच भाषेतील Les Misérables या कादंबरीचे ‘दुःखी’ या नावाने मराठीत अनुवादन केले. डॉ. हेन्‍री थॉमस या जगप्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञाच्या The story of human race या पुस्तकाचे मराठीत ‘मानवजातीचा इतिहास’ असे भाषांतर केले. ‘करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयाचे’ हे गुरुजींच्या जीवनाचे सार होते. मनोरंजनातून मुलांवर सुसंस्कार करण्यासाठी गुरुजींनी अनेक पुस्तके लिहिली. साने गुरुजींचे भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्मावर निरतिशय प्रेम होते. त्यानी भारतीय संस्कृती हा ग्रंथ लिहिला. तसेच भारतीय संस्कृतीतील अनेक महापुरुषांची चरित्रे लिहिली. त्यांचे ‘मोरी गाय’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे. मातृहृदयी गुरुजींनी आई वडिलांच्या प्रेमावर ‘मोलकरीण’ नावाची अप्रतिम कादंबरी लिहिली ज्यावर पुढे जाऊन मराठी चित्रपट निघाला.

त्यांनी आपल्या प्रेमळ व्यक्तित्वाने पुढील पिढीतील एस.एम. जोशी, ग.प्र. प्रधान, दादा गुजर, ना.ग. गोरे, प्रकाशभाई मोहाडीकर, प्रा. प्र.द. पुराणिक, मधु दंडवते, यदुनाथ थत्ते, रा.ग. जाधव,राजा मंगळवेढेकर, वा.रा. सोनार, शांतीलाल पटणी, सी.न. वाणी, इत्यादी अनेक थोर व्यक्तित्वे घडविली.

साने गुरुजींनी लिहिलेली पुस्तके

0
श्याम
0
धर्म व संस्कृती
0
चरित्रे
0
बालसाहित्य व कथा
0
गोष्टी व निबंध
0
इतर

About Smarak

Sane Guruji National Memorial

Activities

Know about our lastest Activity

Contact

Contact Us